औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भात पावसाचे धूमशान सुरूच असून, परभणी, पैठण, बीड, वाशिम, नगर येथे शनिवारी पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी पहाटे ३.२५ वाजता ढगफुटीपेक्षाही अधिक वेगाने अवघ्या २५ मिनिटांत ५१.२ मिलीमीटर पाऊस कोसळला. यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सुखना नदीचे पाणी पात्राबाहेर पडून गाव तसेच शहरात शिरल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहेत.
गोदाकाठच्या ४३ गावांना अलर्ट देण्यात आला अहे. शोध बचाव पथक आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात गारपीट झाल्याने अडाण, उमा नदीला पूर आला. शेतातील साेयाबीनच्या गंज्या वाहून गेल्याने त्यांचे यावर्षी आलेले पीक हातून गेले आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारीही चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पावसाने धुवाधार हजेरी लावली. यामुळे चार मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बीडमधील कन्नड तालुक्यातील वाकद येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात सुनील चिकटे हा तरुण वाहून गेला.
पंचनाम्यासाठी पैसे मागणे गंभीर, कारवाई करा - फडणवीसआतापर्यंत पंचनामे झालेले नसून, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी ५०० रुपयांची मागणी करीत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वाशिम येथे मांडली. पीकविमा कंपन्यांनी शासकीय पंचनामे मान्य करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे मागणे गंभीर बाब असून, अशा अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी हिंगोलीत केली.
तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्याअतिवृष्टीमुळे पीक वाया गेल्याने योगेश खांडवे (वय २५) या शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी (जि. बीड) येथे घडली. अमरावती येथे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला कंटाळून संजय धनराज तेलंग (४०) या अल्पभूधारक शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. औसा (जि. लातूर) येथील शंकर माळी या शेतकऱ्यानेही गळफास घेतला.