मुंबई - महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सरकार बहुमत चाचणीत यशस्वी ठरलं आहे. १६४ मतांनी शिंदे सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार आणि काही अपक्ष आमदारांनी शिंदे सरकारवर विश्वास दाखवला. बहुमत चाचणीवेळी बविआची ३ मते, मनसेचे राजू पाटील यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले.
विधानसभा अध्यक्षनिवडीनंतर आज होणाऱ्या बहुमत चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होते. यात शिवसेनेचे ठाकरे गटाचे आणखी एक आमदार शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला धक्का बसला. शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले.
अध्यक्ष निवडीत शिंदे सरकारनं पहिला डाव जिंकलाविधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. त्यानंतर शिंदे सरकारच्या वतीने सोमवारी भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेऊन शिंदे सरकारने बहुमत चाचणी यशस्वी पार केली. त्यामुळे या सरकारला १६६ आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेच्या व्हिपवरून संघर्षशिवसेनेतील ५५ आमदारांपैकी तब्बल ४० आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेना विधिमंडळात गटबाजी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांना प्रतोद नेमलं आहे. तर शिंदे गटाने बहुमत आमच्याकडे आहे असं सांगत प्रभू यांची नियुक्ती रद्द करून भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक केली आहे. त्यात विश्वासदर्शक ठरावावेळी दोन्ही बाजूच्या प्रतोदांनी व्हिप जारी केला. मात्र सुनील प्रभू यांचा व्हिप झुगारून ४० आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आता शिवसेनेच्या ठाकरे गट-शिंदे गटात कायदेशीर लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.