मुंबई : ६ आॅक्टोबरपासून भारतात सुरु होत असलेल्या फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहचली असताना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यात १५ सप्टेंबरला ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ उपक्रम दिमाखात साजरा केला जाणार आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये फुटबॉल खेळले जाणार असल्याची माहिती क्रीडामंत्र्यांनी यावेळी दिली.तावडे यांनी या उपक्रमाची माहिती देताना म्हटले की, ‘सध्या भारतात १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा जोर वाढला आहे. यानिमित्ताने राज्यात होत असलेल्या मिशन वन मिलियन उपक्रम अंतर्गत आम्ही राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्याचे आवाहन करणार आहोत. या उपक्रमाची सुरुवात मुंबईतून होणार असून राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॉम्बे जिमखाना येथे या उपक्रमाचे ध्वज फडकावून उद्घाटन करतील.’या उपक्रमामध्ये मुंबईचे डबेवाले, मूकबधिर विद्यार्थी तसेच कॅन्सरग्रस्तही यावेळी सहभागी होणार आहेत. त्याचप्रामणे, शिवाजी पार्क, ओव्हल मैदान, आझाद मैदान आणि मरिन लाइन्स येथील विविध मैदानावर फुटबॉल सामने खेळविण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी यावेळी दिली.विशेष म्हणजे या अभिनव उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सुमारे ३० हजार शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण एक लाख फुटबॉलचे वाटपही राज्य सरकारकडून केले जात आहे.आज अनेक शालेय विद्यार्थी मोबाईल किंवा कॉम्प्युटर गेम अधिक खेळत असून मैदानावर कमी खेळतात. मुलांना मैदानावर आणण्यासाठी हा प्रमुख उद्देश यामागे असल्याचेही क्रीडामंत्री तावडे यांनी यावेळी सांगितले.अशा प्रकारे बसणार फुटबॉल किक...मुंबईत सुमारे ३ लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणारदिवसभर मुंबईत फुटबॉल सामन्यांचे आयोजनबुलढाण्यामध्ये आजोबा, मुलगा व नातू असे एकाच कुटुंबातील तीन पिढ्या फुटबॉल खेळणार.ठाण्यातील आदिवासी पाड्यांवरही फुटबॉल रंगणार.सिंधुदुर्गात बीच फुटबॉलचे आकर्षण.केंद्रीय कारागृहातील कर्मचारी विरुद्ध कैदी असा विशेष सामना.फुटबॉलवर आधारीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन.कोल्हापूर येथील न्यू पॅलेस मैदानावर ६० संघांचे सामनेसोलापूरमध्ये सर्व शाळा - महाविद्यालयांमध्ये इंटर क्लास सामन्यांचे आयोजन.पुण्यात सव्वाशेहून अधिक फुटबॉल क्लब सहभागी होणार.पुणे मध्यवर्ती कारागृहात विशेष फुटबॉल सामना
युवा विश्वचषकनिमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय, मिशन वन मिलियन, १५ सप्टेंबरला राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 3:40 AM