नीलेश जोशी/अनिल गवई निमखेडी (जि. बुलढाणा) - भारत जोडो पदयात्रेंतर्गत महाराष्ट्रातील जनतेने गेल्या १४ दिवसांत मला प्रेम आणि विश्वास दिला. महाराष्ट्राची शिकवण समरसतेची आहे. ज्यांनी द्वेष पसरविला, ते पण आपलेच आहेत. त्यांच्याविना आपला महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे भावोद्गार समारोपप्रसंगी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी येथे काढले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.
प्रेम व विश्वासाचा संदेश घेत पाच राज्यातून सुमारे १,७०० किमीचा यात्रेचा निम्मा प्रवास महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या सीमेवर ‘एकात्मतेचा प्रकाश’ उजळला. तिरंगी फुगे आकाशात झेपावताच पदयात्रेचा राज्यातील तील भावपूर्ण प्रवास पूर्ण झाला. सामाजिक सौदार्हाची बीजं महाराष्ट्राच्या हृदयात कायमची पेरली गेली.
‘जय महाराष्ट्र’ म्हणत घेतला महाराष्ट्राचा निरोप - निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत राहुल गांधी यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आभार मानले. - देशाच्या विकासासाठी मी सतत संघर्ष करीत राहील, असे आश्वस्त करीत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत महाराष्ट्रातील जनतेचा निरोप घेतला.
तिरंगी प्रकाश पडताच वातावरण भावपूर्णउपस्थितांनी मेणबत्या प्रज्वलित करताच, अंधुक प्रकाशात राहुल गांधीनी कळ दाबली आणि सत्यमेव जयते स्तंभावर तिरंगी प्रकाश पडला. या प्रकाशात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माची प्रतीके प्रकाशाने उजळली. त्यावेळी भावपूर्ण वातावरण झाले.
या नेत्यांची उपस्थितीलाइट ऑफ युनिटी कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, बाळासाहेब थाेरात, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.