- मनोज ताजनेगडचिरोली : गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर धुमाकूळ घालणाऱ्या नक्षल चळवळीला आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणण्यात पोलीस दलाला यश आले आहे. राज्यात नक्षल्यांविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात येत असली तरी छत्तीसगड राज्यात वाढलेला या चळवळीचा जोर महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी जे महाराष्ट्राला जमले ते छत्तीसगडला का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दोन दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना संपवल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोलीला धावती भेट देऊन पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. नक्षलवाद नियंत्रणासाठी महाराष्ट्र-छत्तीसगड पोलिसांमध्ये समन्वय साधण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. छत्तीसगडच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जोपर्यंत नक्षलवादी सक्रिय आहेत तोपर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीतील गडचिरोली किंवा गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या कुरापती सुरूच राहणार आहेत. त्यामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद नियंत्रणात आणणे महाराष्ट्राच्या गृहविभागाला महत्त्वाचे वाटते.
सी-६० पथकामुळे वाढले यशमहाराष्ट्राच्या गृहविभागाने नक्षलविरोधी लढ्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे विशेष प्रशिक्षित कमांडो पथक (सी-६०) तयार केले. विशेष म्हणजे यात स्थानिक लोकांचा समावेश असल्याने त्यांना नागरिकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधता येतो. छत्तीसगडमध्ये मात्र नक्षलविरोधी अभियान केंद्रीय सुरक्षा दलांच्या भरवशावर राबविले जात असल्याने त्यांना अपेक्षित यश येत नसल्याची खंत पोलीस अधिकारी व्यक्त करतात.
महाराष्ट्रात ज्या भागात नक्षलवादी सर्वाधिक सक्रिय आहेत त्या गडचिरोली आणि छत्तीसगडमधील लगतच्या जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती सारखीच आहे. त्यामुळे नक्षलविरोधी अभियान राबविताना येणाऱ्या अडचणी दोन्ही बाजूने सारख्याच आहेत. तरीही छत्तीसगड पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानात आक्रमकता आणि नियोजनाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे नक्षलवादी तिकडे मोकळेपणाने वास्तव्य करतात. युवक-युवतींची भरती करून त्यांना प्रशिक्षणही देतात. तेच नक्षली नंतर गडचिरोलीत पाठवले जातात.
गडचिरोली जिल्ह्यालगतच्या नारायणपूर-बिजापूर जिल्ह्यांमध्ये छत्तीसगड पोलिसांनी दर १५ ते २० किलोमीटरवर आऊटपोस्ट निर्माण करून नेटवर्क वाढवणे गरजेचे आहे. ते नसल्यामुळे त्या भागात नक्षलवाद्यांसाठी रान मोकळे आहे. शस्रांच्या कारखाना आणि प्रशिक्षणही त्याच भागात दिले जाते. त्यांचा वापर नंतर महाराष्ट्राच्या हद्दीत केला जातो. - संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली
अडीच वर्षांत १४२ नक्षलवादी ‘आउट’नक्षलविरोधी अभियान पथकाने २०१९ ते मे २०२१ या अडीच वर्षांच्या कालावधीत ६० नक्षलवाद्यांना अटक केली. पोलीस चकमकीत ४१ जण ठार झाले, तर ४१ जणांनी आत्मसमर्पण केले. अलीकडे गडचिरोली जिल्ह्यातून नक्षल चळवळीत जाणाऱ्यांची संख्याही बरीच कमी झाली आहे.