मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी शब्दच दिला नव्हता, असे सांगून मला खोटे ठरविणाऱ्या धोकेबाजांना धडा शिकवायचाच असून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे अटळ आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.शिवसेना आमदारांची मातोश्रीवर शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत बोलताना उद्धव म्हणाले, ‘हे आपल्याला सोडून जातील कुठे,यांना आपल्याशिवाय पर्याय नाही’ असे वाटणाºया भाजपने आम्हाला अनेक वर्षे गृहित धरले. शिवसेनेची त्यांच्यासोबत फरपट झाली. नितीशकुमार यांच्याबरोबर भाजप सोईनुसार युती तोडते आणि नंतर करते, त्यांना मेहबुबा मुफ्तीही सत्तेसाठी चालतात मग आमचे वावडे कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.फडणवीसांनी मला खोटे ठरविले‘तुम्ही मला इतकी वर्षे पाहत आहात, मी कधीच खोटे बोललेलो नाही, तो माझा संस्कार नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी मलाच खोटे ठरविले. आता त्यांना धोकेबाजांना जागा दाखविण्याची वेळआली आहे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याइतपत आमच्याकडे संख्याबळ नाही. अशावेळी कोणाची ना कोणाची मदत घेणे आवश्यक होते. आम्हाला गृहित धरणाऱ्यांच्या मागे जाण्यापेक्षा आम्ही नवीन मित्र शोधले, असे उद्धव म्हणाले.गेली तीस वर्षे भाजपचे आम्ही मित्र होतो पण इतक्या जुन्या मित्राची त्यांनी किंमत ठेवली नाही. विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेबाबत विश्वासात घेण्याची गरजही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना वाटली नाही, अशी टीका उद्धव यांनी बैठकीत केली.
Maharashtra Government : धोकेबाजांना जागा दाखवूच - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 2:18 AM