मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच राज्याचं नेतृत्त्व करताना दिसेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं असलं तरी उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन भाजपासोबत गेलेल्या अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार का, याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल. मात्र ते आज उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेणार नाहीत. अजित पवारांनी गेल्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. महाविकासआघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असताना अजित पवार यांनी थेट भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या ३ दिवसांत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राजीनामा दिला. त्यामुळे भाजपा सरकार कोसळलं.
Maharashtra Government: अजित पवार पुन्हा येणार, उपमुख्यमंत्री होणार; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 10:14 AM