मुंबईः विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. परंतु विश्वासदर्शक ठराव मांडत असताना अजित पवार हे जितेंद्र आव्हाडांवर संतापले आणि तोच चर्चेचा विषय ठरला आहे.त्याचं झालं असं की, विश्वासदर्शक ठरावावेळी प्रत्येक आमदाराच्या आसनाला ठरावीक अनुक्रमांक बहाल करण्यात येतो. त्याप्रमाणे विधानसभेतल्या प्रत्येक सदस्यानं विश्वासदर्शक ठरावावर मतदान करायचं असतं. विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देण्यासाठी जागेवर उभं राहून आपलं नाव सांगत अनुक्रमांकाचा उल्लेख करावा लागतो. परंतु नाव आणि अनुक्रमांकाचा उल्लेख करताना बऱ्याचदा आमदारांनी गफलत होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडसुद्धा अशाच प्रकारे गोंधळून गेल्याचं पाहायला मिळाले.मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर ती गणती वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत आली. त्यांनी आपला अनुक्रमांक 14 सांगत स्वतःचं नाव सांगितलं. त्यानंतर अॅड. के. सी. पाडवींनीसुद्धा स्वतःचा अनुक्रमांक 15 सांगत नाव सांगितले. जितेंद्र आव्हाडांचा नंबर आल्यानंतर त्यांची गल्लत झाली. जितेंद्र आव्हाडांनी आपलं नाव सांगत अनुक्रमांक 16 ऐवजी थेट 20 सांगितला. त्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले. हा प्रकार अजितदादांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच आव्हाडांना तुमचा क्रमांक 20 नसून 16 आहे, असं सांगितलं.अजितदादांनी रागाच्या भरातच आव्हाडांना सर्वांसमक्ष सुनावले. आव्हाडांच्या शेजारी बसलेल्या हसन मुश्रीफांनीसुद्धा ही चूक आव्हाडांच्या ध्यानात आणून दिली. तसाच काहीसा प्रकार आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबतही झालेला पाहायला मिळाला. त्यांना 100 अनुक्रमांक देण्यात आल्यानंतरही त्यांनी 78 असा उच्चारला. ही चूक लागलीच त्यांच्या शेजारी बसलेल्या आमदारांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. पण आदित्य ठाकरे यांनी बहुमत चाचणीदरम्यान आपल्या नावाचा उल्लेख करताना आदित्य रश्मी उद्धव ठाकरे असं म्हटलं, तर अनुक्रमांक 25 असल्याचं नमूद केलं.
Maharashtra Government: …म्हणून भर विधानसभेतच अजितदादा जितेंद्र आव्हाडांवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 8:47 PM