मुंबई : राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, भाजपाने हे वृत्त फेटाळले असून अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचा दावा केला आहे. आशिष शेलार यांनी जयंत पाटलांनी प्रतिदावा केला आहे, पत्र नाही असा दावा केला आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी कोणाला मतदान करावे यावरून पक्षाचा गटनेता व्हीप काढण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवार यांना तो हक्क असल्याचे बोलले जात होते. मात्र, विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी अजित पवार नाहीत तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच गटनेते असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे ते किंवा पक्ष प्रतोदच आमदारांना व्हीप काढू शकणार असल्याचे भागवत म्हणाले होते. मात्र, भाजपाने हे अमान्य केले असून अजित पवारच विधिमंडळ गटनेते असल्याचे म्हटले आहे. अजित पवारांनी राज्यपालांकडे गटनेते या नात्याने आमदारांच्या कथित सह्यांचे पत्र दिले आहे. मात्र, विधिमंडळात राष्ट्रवादीने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचे पत्र सोमवारी दिले आहे. यामुळे पुढील निर्णय सध्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना घ्यावा लागणार आहे.
भागवत म्हणाले, विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष वा सरचिटणीस करतो. निवडीची माहिती ३० दिवसांत विधानसभा अध्यक्ष वा विधान भवनाच्या सचिवांकडे द्यावी लागते. शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे.
राज्यपाल व विधिमंडळ या दोन स्वतंत्र घटनात्मक संस्था आहेत. दोन्ही ठिकाणी गटनेता निवडल्याची माहिती द्यावी लागते. राष्ट्रवादीने राज्यपालांकडे कोणती माहिती दिली हे विधानसभाध्यक्षांना ठाऊक नसते. राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केल्याची माहिती अध्यक्षांना कळवली नव्हती. त्यामुळे त्यांना विधिमंडळ गटनेता समजता येणार नाही. आता जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती दिल्यामुळे तेच पक्षाचे विधिमंडळ गटनेते असतील.