मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं ट्विट केलं आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत दिले आहेत. काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज ट्विटरवर सक्रीय झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले आहेत. काल सकाळी अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र काल दिवसभरात अजित पवार यांनी एकही ट्विट केलं नव्हतं. अखेर आज अजित पवार ट्विटरवर सक्रीय झाले. त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींचे आभार मानले. आम्ही राज्यात स्थिर सरकार देऊ आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी काम करू, असं आश्वासन अजित पवारांनी ट्विटमधून दिलं. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमित शहांनीदेखील अजित पवारांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचेही अजित पवार यांनी आभार मानले आहेत. याशिवाय नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, राजनाथ सिंह, पीयूष गोयल, जे. पी. नड्डा, सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नक्वी, सुरेश जैन, गिरीश बापट, विजय रुपाणी, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, डॉ. धर्मेंद्र प्रधान यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.