नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटी लागू झालेली आहे. शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागली असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. शिवसेना राष्ट्रवादीलाही सत्ता स्थापन करता न आल्याने मध्यावधी निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. यावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप करत शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. यावर शहा यांनी टीका केली आहे. शिवसेनेला तीन दिवस हवे होते, आता तर पाच दिवस झाले आहेत. तरीही त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. राज्यपालांनी अजून सहा महिने दिले असल्याचा टोला शहा यांनी लगावला. तसेच भाजपा मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याच्या वृत्तावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईत आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. या बैठकीत संघटनात्मक कार्यप्रणालीवर चर्चा करण्यात येणार आहे. गरज पडली तर मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत.
मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असे आपल्याला वाटत नाही आणि तसा विचारही मी करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल राष्ट्रपती राजवटीचे सहा महिने पूर्ण झाल्यास कायदेशीर सल्ला घेतील. त्यानंतर त्यांचा निर्णय घेतील. तोपर्यंत कोणत्याही पक्षाने बहुमत दाखविल्यास त्यांचे सरकार स्थापन करू शकतात, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याचबरोबर राष्ट्रपती राजवट लागू केल्यावरून होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याचा तोटा भाजपालाच जास्त झाला आहे. विरोधकांचे यात नुकसान काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच जर राष्ट्रपती राजवट लागू केली नसती तर आमच्यावर सरकार सुरूच ठेवल्याचा आरोप झाला असता, असेही त्यांनी म्हटले.