मुंबई : जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.चव्हाण यांच्या जलक्रांती विषयक विचारांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संदर्भ ग्रंथ व लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन केले जाईल. नांदेड शहरातील विष्णुपुरी प्रकल्पाजवळ शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्याचा आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड शहरात ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व मुला-मुलींचे वसतीगृह उभारणे आदी कामे देखील प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांच्या निधीसाठी संबंधित विभागांना आवश्यक ती तरतूद करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.डॉ. शंकरराव चव्हाण यांचा जन्म १४ जुलै १९२० रोजी झाला होता. १५ जुलै २०१९ पासून १४ जुलै २०२० पर्यंत त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, यानिमित्त राज्य शासनाने हे निर्णय घेतले आहेत. विधीमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मांडण्याची घोषणा देखील यापूर्वीच झालेली आहे.
राज्य सरकार शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 7:07 PM