मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना विधानसभेत सुद्धा भाजपचीचं सत्ता येणार असल्याची अपेक्षा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा या घटक पक्षांनी युती सोबत राहण्याचे पसंद केले. मात्र निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना वेगळी झाली व महाविकास आघाडीची निर्मिती होऊन सत्तास्थापना सुद्धा होत आहे. त्यामुळे आता भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने घटक पक्षांच्या मदतीने महायुती करून निवडणूक लढवली होती. लोकसभेला मिळाले यश पाहता पुन्हा भाजपचीच राज्यात सत्ता येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत राहण्याची संधी असल्याची अपेक्षा घटक पक्षांना होती. मात्र, निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना पक्ष वेगवेगळे झाल्यामुळे बहुमत असून, सरकार स्थापन करू शकले नाहीत.
तर अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. त्यामुळे गेलेली संधी पुन्हा निर्माण झाली असल्याचे घटक पक्षांना वाटत होते. मात्र, फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी पायउतार झाले. फडणवीस यांनी राजीनामा दिला.
त्यांनतर शिवसनेने राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. अखेर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरवून ह्या तिन्ही पक्षांनी सत्तास्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला. त्यानुसार आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, राज्यात नव्यानेच महाविकास आघाडीची सत्ता स्थापना होणार आहे. मात्र यामुळे भाजपच्या घटकपक्षांच्या अपेक्षा भंग झाल्या आहे.भाजपचे घटकपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाइं रामदास आठवले गटाचे अविनाश महातेकर हे गेल्यावेळी मंत्री होते. पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले असते, तर या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली असती. मात्र, तसे काही घडले नाही. त्यामुळे भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले असल्याचे बोलले जात आहे.