Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 06:01 PM2019-11-24T18:01:10+5:302019-11-24T18:04:18+5:30
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन राष्ट्रवादीला धक्का देणाऱ्या भाजपानं आता ऑपरेशन लोटसची तयारी सुरू केली आहे. त्याची जबाबदारी भाजपानं चार नेत्यांवर सोपवली आहे. 30 नोव्हेंबरला भाजपाला बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यादृष्टीनं भाजपानं ऑपरेशन लोटसवर काम सुरू केलं आहे.
भाजपानं बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. त्याची जबाबदारी नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते आणि गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून भाजपात दाखल झाले आहेत. तर बबनराव पाचपुते, गणेश नाईक राष्ट्रवादीतून आलेले आहेत. त्यामुळेच या नेत्यांवर ऑपरेशन लोटसची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एकीकडे भाजपानं ऑपरेशन लोटस सुरू केलं असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी तिन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोडाफोड केली जाणार नसल्याचं म्हटलं होतं. फोडाफोड करणं आमची संस्कृती नसल्याचं ते म्हणाले होते.