मुंबईः गेल्या अनेक दिवसांचा राज्यातला राजकीय पेच अखेर संपुष्टात आला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे. बहुमत सिद्ध करत असताना फडणवीसांनी तांत्रिक कारणं देत उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. परंतु तरीही न डगमगता उद्धव ठाकरेंनीसुद्धा आपल्या मितभाषी स्वभावानुसार कृतीतून नवा आदर्श निर्माण केला. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बहुमत असतानाही मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी भाजपा-शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याचा कार्यक्रम सुरूच होता. तीन दशकांपासून जो पक्ष सोबत होता तो आता विरोधात आहे, तर ज्यांच्याशी निवडणुकीत संघर्ष केला त्यांच्याच सोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे विधानसभेत काय बोलतात आणि कोणती भूमिका घेतात, याचीच सगळ्यांना उत्कंठा लागली होती.विधानसभेत येण्याचा उद्धव यांचा पहिलाच दिवस असल्यानं भाजपा त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याची सगळ्यांनाच कल्पना होती. पण उद्धव ठाकरे कुठेही तोल ढळू न देता विधानसभेत थेट विरोधी बाकांवर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांजवळ गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली. तसेच त्यांच्या खांद्यावरही हात ठेवला, त्यामुळे विधानसभेत उपस्थित असलेल्या आमदारांचा भुवया उंचावल्या, सगळ्याच स्तरातून उद्धव ठाकरेंच्या या कृतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुल गांधी स्टाईल सभागृहात गाजली होती आणि त्याची जोरदार चर्चाही झाली. लोकसभेतही एकदा अनपेक्षितपणे राहुल गांधींनी भाषणानंतर मोदींच्या आसनाजवळ जात त्यांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. ती गळाभेट चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या गळाभेटीची चर्चा होत आहे. दरम्यान, सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मंत्रिमंडळावर सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल मी आभार मानतो. तमाम जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडिलांना स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्याचे शपथ घेतली आहे. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Maharashtra Government: विधानसभेत एकच चर्चा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 7:54 PM