Maharashtra Government: समन्वयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:38 AM2019-11-20T03:38:14+5:302019-11-20T06:18:45+5:30
तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे शिवसेनेशी रविवारपासून चर्चेला प्रारंभ करणार
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रात बिगरभाजप सरकार स्थापण्याच्या दृष्टीने किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपापल्या प्रत्येकी पाच अशा दहा नेत्यांची एक समन्वय समिती नेमली आहे. त्याचप्रमाणे, तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे शिवसेनेशी रविवारपासून चर्चेला प्रारंभ करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी असली, तरी आमचे स्वतंत्र जाहीरनामे होते. त्यामुळे आधी आम्ही आमचा किमान समान कार्यक्रम तयार करू. त्यानंतर, शिवसेनेशी चर्चा करून तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविणार आहोत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे व अन्य एक नेता तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे व अन्य एक जण यांचा या दोन पक्षांच्या समन्वय समितीत समावेश असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा किमान समान कार्यक्रम येत्या तीन दिवसांत तयार करण्याचे व त्यांतर शिवसेनेशी तीन पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाविषयी बोलणी करण्याचे सोनिया गांधी व शरद पवार यांच्या बैठकीत ठरविण्यात आले. या घडामोडींमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला अयोध्या दौरा रद्द केला आहे. तिथून ते दिल्लीला जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार होते. तोही बेत आता रद्द झाला आहे.