मुंबई : काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळू शकल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. या घडामोडीमुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेस आमदारांनी स्वतंत्र गट करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांना मुंबईला पाठविल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यानंतर सूत्रे हलले आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे दिल्लीहून मुंबईत दाखल झाले.सोमवारी रात्री काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र देण्यास नकार दिल्यानंतर जयपूर येथे असलेल्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. काही आमदारांनी रात्री अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आम्ही वेगळा गट करायला तयार आहोत, मात्र कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सरकार बनवा, असे सांगितल्याचे कळते.काँग्रेस आमदारांच्या फोननंतर राष्ट्रवादीचे नेते रात्र उशिरा ‘सिल्व्हर ओक’वर जमले. तिथेची पुढची रणनिती ठरली. त्यानंतर सकाळी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला. काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, अनेक आमदारांनी फोन करून वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे. हे टाळायचे असेल तर तातडीने निर्णय घ्यावा लागेल अशी याची कल्पनाही त्यांना दिली.या घडामोडीनंतर सकाळी अकराच्या विमानाने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे मुंबईला निघाले. ते विमानात असताना साडेबाराच्या सुमारास वेणुगोपाल यांनी ट्विट करून आम्ही चर्चा करण्यासाठी शरद पवार यांना भेटण्याकरता मुंबईत जात आहोत असे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस आमदारांनी आपली भूमिका बदलली, अशी माहिती समोर येत आहे.
Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 5:20 AM