नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सर्व मुद्यांवर एकमत झाले असून लवकरच सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कालपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरू असलेली मॅरेथॉन बैठक आज अखेर संपली आहे. या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत सत्ता स्थापनेच्या सर्व मुद्द्यांवर एकमत झाले आहे. महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरु आहे. उद्या आम्ही मुंबईला जाऊन घटकपक्षांशी चर्चा करु, त्यांना आतापर्यंत झालेल्या चर्चेची माहिती देऊ, त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करु, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
तसेच, या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेले नाही. दिल्लीतील बैठक झाली, आता मुंबईत चर्चा करु. त्यानंतर सर्व चर्चा झाल्यानंतर माध्यमांना माहिती देऊ असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकानंतर लवकरच महाशिवआघाडीचे सरकार प्रत्यक्ष सत्तेवर येण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिवसेना 14, राष्ट्रवादी 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे देण्याचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सुत्रांकडून समजते.