Maharashtra Government: तीन तीन खात्यांचे गट; महाविकास आघाडीत 'असं' होणार सत्तापदांचं वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 02:37 AM2019-11-22T02:37:25+5:302019-11-22T06:53:24+5:30
तीनही पक्षांकडून प्रत्येकी ३ नेते एकत्र बसणार
- अतुल कुलकर्णी
मुंबई : सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या प्रत्येकी ३ अशा नऊ नेत्यांची उद्या शुक्रवारी मुंबईत बैठक होणार आहे. त्या बैठकीत दिल्लीच्या बैठकीचा आढावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला जाईल आणि त्यानंतरच कोणी कोणते खाते घ्यायचे याचा निर्णय त्या बैठकीत होईल. अद्याप कोणते खाते कोणी घ्यायचे याचा कसलाही निर्णय झालेला नाही, मात्र जे काही चालू आहे. त्या केवळ शक्यता आहेत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
तीन तीन खात्यांचा एक गट तयार करण्यात आला आहे. त्या गटांचे वाटप तीन पक्षांमध्ये केले जाणार आहे. त्यानुसार महसूल, गृह व नगरविकास असा एक गट बनवण्यात आला आहे. त्यानंतर वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम आणि उर्जा यांचा एक गट तसेच कृषी, सहकार आणि ग्रामविकास यांचा एक गट, तर सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, आणि उच्च व तंत्रशिक्षण असा एक गट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही खाती तीन पक्षांमध्ये विभागली जातील. सहकार आणि सांस्कृतिक कार्य हे खाते मिळावे यासाठी राष्ट्रवादी पक्ष प्रयत्नशील आहे तर आरोग्य खाते शिवसेनेला मिळावे, असे त्यांच्या नेत्यांना वाटत आहे.
महसूल आणि गृह विभाग हे काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जातील आणि नगरविकास हे खाते शिवसेनेकडे जाईल असे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्रिपद हे अडीच अडीच वर्षे विभागून घेण्याचा निर्णय झाला का?, असा सवाल एका पत्रकाराने छगन भुजबळ यांना विचारला असता, तुम्हीच ते ठरवले आहे. आमच्याकडे अशी कोणतीही चर्चा झाली नाही, अशा शब्दांत चिमटा काढला.
येत्या दोन दिवसांत तीनही पक्षांची एकत्रित चर्चा होईल. त्यात राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधिमंडळ गटनेते अजित पवार त्यात सहभागी होतील, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने स्पष्ट केले.
हे भविष्य राज ठाकरे यांना आधीच समजले होते...
भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका एकत्र लढवणार आणि निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार... हा काय पत्त्यांचा क्लब आहे का? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला’’, असे विधान नाशिकच्या एका जाहीर सभेत दोन वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. ज्यावेळी शिवसेनेचे मंत्री आम्ही आमचे राजीनामे खिशात घेऊन फिरतोय अशी विधाने करत होते, तेव्हा राज यांनी हे विधान जाहीर सभेत केले होते.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेकडून कोण?
मुख्यमंत्रिपद शिवसेनेत कोणत्या नेत्याला मिळेल यावर चर्चा सुरू आहे. स्वत: उद्धव ठाकरे हे पद घेण्यास फारसे इच्छुक नाहीत. मी शिवसैनिकांसाठी हे पद घेत आहे, असे त्यांनी याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, खा. अनिल देसाई, खा. संजय राऊत किंवा अरविंद सावंत या नावांचीही चर्चा शिवसेनेत जोरात आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे सगळ्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यात ते त्यांच्या मनात कोणाचे नाव आहे याचीही चाचपणी करतील, असे समजते.