मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी सध्या चालू असलेल्या राज्यातील राजकीय घडामोडींनंतर आपलं मौन सोडलं आहे. अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीच्या गोटात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यानंतर, लगेचच धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'मी राष्ट्रवादीसोबत आणि शरद पवार साहेबांसोबतच आहे, कुणी कोणताही संभ्रम निर्माण करू नये', असे मत ट्विटरवरुन धनंजय मुंडेंनी माडले आहे. त्यामुळे मुंडेंच्या भूमिकेतील चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला, असे म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं ट्विट केलं. एकीकडे राष्ट्रवादीकडून
अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत त्यातून दिले. तसेच, मी राष्ट्रवादीसोबतच कायम राहीन अन् शरद पवार हेच आमचे नेते असतील, असेही अजित पवारांनी ट्विट करुन म्हटलंय. अजित पवारांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या गटात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे, तात्काळ शरद पवारांनी ट्विट करुन अजित पवार हे संभ्रम निर्माण करत असल्याचं सांगितलं. तसेच, भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरणही शरद पवारांनी दिलंय. त्यानंतर, धनंजय मुंडेंनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, कुणीही संभ्रम निर्माण करू नये, असे ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय. धनंजय मुंडे यांनी मौन बाळगल्यामुळे राष्ट्रवादीचीही धाकधूक वाढली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंशी स्वतः चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील ‘ट्विटर वॉर’नंतर धनंजय मुंडेंनीही त्यांची भूमिका जाहीर केली.
दरम्यान, शनिवारी सकाळीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज ट्विटरवर सक्रीय झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या ट्विटचा सिलसिला सुरूच राहिला. अजित पवार यांनी एक धक्कादायक ट्विट केलंय. त्यामध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असेही अजित पवारांनी म्हटलंय. त्यासोबच भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असेही अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय.