Maharashtra Government : मुख्यमंत्र्यांकडे बहुमत आहे का?; सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर भाजपा म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 12:03 PM2019-11-25T12:03:06+5:302019-11-25T12:08:48+5:30
राज्यातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.
नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे भाजपाला सत्ता स्थापन करण्याची संधी दिली, ती सर्व कागदपत्रं न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या वकीलांना मुख्यमंत्र्याकडे बहुमत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांचा भाजपाला पाठिंबा असल्याचं मुकूल रोहतगी (भाजपाचे वकील) यांनी सांगितले.
न्यायमूर्ती खन्ना यांनी भाजपाला ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्यांची सध्याची स्थिती काय आहे असा प्रश्न विचारल्यानंतर रोहतगी यांनी सध्या आम्हाला यावर निश्चित सांगता येणार नाही. कारण त्यांच्यात अंतर्गत वाद आहे. मात्र बहुमत चाचणीत हे सिद्ध होईल असा दावा रोहतगी यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीनं युक्तीवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, 'आमदारांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं. राज्यपालांची फसवणूक करण्यात आली. ते पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, ते दुसरीकडं जोडण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकीलांनी केला. तसेच दोन्ही पक्ष बहुमत चाचणीसाठी तयार आहे. मग उशीर कशासाठी केला जातोय. एकतरी आमदार भाजपासोबत गेला आहे का? तसं सांगणार पत्र आहे का? न्यायालयानं दिलेले जुने आदेश डावलता येणार नाही. त्यामुळं हंगामी अध्यक्ष नेमून बहुमत चाचणी आजच व्हायला हवी,' अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने या याचिकेवर उद्या अंतिम सुनावणी देणार असल्याचे जाहीर केले आहे.