मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकासआघाडी असे नवे सरकार राज्यात स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, हे महाविकासआघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
भाजपा-शिवसेना युती हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित होती. आजही आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. अशी युती तोडणे म्हणजे केवळ देशाचेच नव्हे तर हिंदुत्व आणि महाराष्ट्राचे नुकसान आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, राज्यातील नवे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थिर राहणार नाही, हे सरकार महाराष्ट्राच्या भल्याचे नाही. अस्थिर सरकार आल्यास महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
ही आघाडी कोणत्याही सिद्धांतांच्या, विचारांच्या जोरावर बनलेली नाही. शिवसेनेच्या विचारांशी काँग्रेस कधी सहमत नव्हती आणि नसेल. त्याचबरोबर काँग्रेस ज्या विचारांवर बनलेला पक्ष आहे, ते विचार शिवसेनेला मान्य नाहीत. ही एक सत्तेसाठी बनवलेली संधीसाधू आघाडी आहे. याचबरोबर, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, असाही नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे.
दरम्यान, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपाकडून अडीच- अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा सुरु केली आहे. तसेच, शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.