Maharashtra Government: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:44 AM2019-12-02T05:44:14+5:302019-12-02T05:44:48+5:30
मंत्रिमंडळ बनविणे व त्याचा विस्तार तसेच घटक पक्षांशी समन्वय साधण्यासाठी तीनही पक्षांनी दोन समित्या स्थापन केल्या आहेत.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे.
सूूत्रांनी सांगितले की, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवेसना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे मत आहे. जनकल्याणासाठी काही निर्णय तातडीने घेण्याची उद्धव ठाकरे यांना इच्छा आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर लागणार असल्याने त्यासाठी सर्वांनाच काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. मंत्रिमंडळ बनविणे व त्याचा विस्तार तसेच घटक पक्षांशी समन्वय साधण्यासाठी तीनही पक्षांनी दोन समित्या स्थापन केल्या आहेत.
अजित पवारांना स्थिरस्थावर होण्यासाठी अजून वेळ हवा भाजपबरोबर हातमिळवणी करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करायला निघालेल्या अजित पवारांचे बंड फसले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व पुन्हा राष्ट्रवादीत परतले. मात्र तरीही त्यांची नाराजी अजूनही संपलेली नाही. त्यांच्या राजकीय हालचालींमुळे माजलेला गोंधळ आता शमला असला तरी अजित पवार यांना स्थिरस्थावर होण्यासाठी अजून काही वेळ हवा आहे. ते लवकरच आपल्या विधानसभा मतदारसंघाला भेट देण्याची शक्यता आहे.