Maharashtra Government: अखेर महाशिवआघाडीची बैठक सुरू; आघाडीचे सहा तर शिवसेनेचे दोन नेते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 06:00 PM2019-11-14T18:00:31+5:302019-11-14T18:06:34+5:30
काल सायंकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू होत्या. यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला घाई नसल्याचे म्हटले होते.
मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी वेळ मागणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत एकत्र येण्याचे ठरविले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आधी एकत्र चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरविण्याची भुमिका घेतली होती. आधी आमचे ठरले की मग शिवसेनेचा विचार करू असे त्यांचे नेते म्हणाले होते. आता या हालचालींना वेग आला आहे.
काल सायंकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू होत्या. यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला घाई नसल्याचे म्हटले होते. कालच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, नवाब मलिक, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण व विजय वडेट्टीवार हे नेते होते.
आज सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत बैठक सुरू केली आहे. तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीचे नेते या बैठकीला उपस्थित झाले आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित आहेत. शिवसेनेकडून दोनच नेते आलेले असून यामध्ये एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांचा समावेश आहे.