मुंबई - क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. आपण सामना गमावत आहोत, असं कधी कधी वाटू लागतं. मात्र, त्यानंतर वेगळाच निकाल समोर येतो, अशा शब्दांमध्ये केंद्रीय भूपृष्ठमंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं होतं. तर, दुसरीकडे सरकार भाजपाचेच येणार, असा आत्मविश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा बोलून दाखवला आहे. सामानाच्या अग्रलेखातून या दोन्ही भाजपा नेत्यांना लक्ष्य बनविण्यात आले आहे. नितीन गडकरींच्या वक्तव्याचाही समाचार सामनातून घेण्यात आला.
भाजपानं राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनं सरकार स्थापनेच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गडकरींनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण आणि सूचक मानलं जातं आहे. कारण, राज्यात आता महाशिवआघाडीचं सरकार येईलन, हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही, गडकरींच्या विधानामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात नितीन गडकरींना सत्ता स्थापनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तुमचा प्रश्न योग्य आहे. मात्र, तो तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारला, असे म्हणत गडकरींनी गुगली टाकली होती. त्यावर, शिवसेनेनं गडकरींच्या गुगलीला चांगलच टोलवलं आहे.
''एका बाजूला फडणवीस ''राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार!'' असा दावा करतात तर दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी यांनी क्रिकेटचे रबरी चेंडू राजकारणात टोलवले आहेत. 'क्रिकेट व राजकारणात अंतिम काहीच नाही. कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल फिरू शकतो. एका क्षणी हातातून गेलेल्या सामन्यात आपण विजय मिळवू शकतो,' असा सिद्धांत गडकरी मांडतात. गडकरी यांचा क्रिकेटशी संबंध नाही. त्यांचा संबंध सिमेंट, इथेनॉल, डांबर वगैरे वस्तूंशी आहे. संबंध असलाच तर तो शरद पवार आणि क्रिकेटचा आहे. आता, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा हे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव झाले. त्यामुळे भाजपचा क्रिकेटशी अधिकृत संबंध जोडला गेला आहे, असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून म्हटले. तसेच, गडकरींच्या गुगलीवर उत्तुंग फटका मारल्याचं दिसून येतंय.