Maharashtra Government: राज्यात शिवसेनेसह सरकार; काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकमत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:32 AM2019-11-21T03:32:39+5:302019-11-21T06:17:33+5:30
घोषणा तीन दिवसांत; उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता
नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवून शिवसेनेसह सरकार स्थापन करण्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बुधवारी चर्चेनंतर एकमत झाले. शरद पवार यांच्याकडे साडेतीन तास झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा झाली.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, आमची चर्चा सकारात्मक होती आणि राज्यात लवकरच नवे सरकार स्थापन होईल. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेसह आम्ही दोघे पक्ष सरकार स्थापन करू, असे स्पष्टपणे सांगितले. राज्यात ३0 नोव्हेंबरपूर्वी तिन्ही पक्षांचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या चर्चेमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट लवकरच संपुष्टात येईल, असे दिसू लागले आहे.
या बैठकीला काँग्रेसतर्फे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, व माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते.
या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय असावा, सत्तेचे वाटप कसे करावे, अधिकारी वर्ग कायम ठेवावा की बदलावा यांसह अनेक बारीकसारीक मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे. मात्र रात्रभरातच चर्चेद्वारे सर्व मुद्दे निकालात काढून येत्या दोन दिवसांत शिवसेनेशी बोलणी केली जातील, असे कळते.
मंत्रिपदांच्या वाटपावर स्पष्टता झालेली नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १४ व काँग्रेसचे १२ मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. या बैठकीआधी काँग्रेसच्या वरील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली.
शिवसेनेने सर्व आमदारांना शुक्रवारी पॅन, आधार कार्ड, आदी पुराव्यासह मुंबईत बोलावले आहे. त्यांना तीन-चार दिवस राहण्याच्या तयारीने येण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्याचे समजते.
पेढ्यांची ऑर्डर द्यायला हरकत नाही : राऊत
ही चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने नेते खा. संजय राऊ त यांनी आता पेढ्यांची ऑर्डर द्यायला हरकत नाही, असे सांगून गोड बातमी लवकरच येईल, असे स्पष्ट केले. नंतर ते शरद पवार यांना भेटायला गेले. पण त्यापूर्वी त्यांनी ‘उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी महाराष्ट्राची इच्छा आहे’, असे सांगतानाच, ‘शिवतीर्थावर शपथविधी होईल, तेव्हा तुम्हाला नाव कळेलच’, असेही नमूद केले.