नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यायचा का व द्यायचा असेल, तर या शक्तिप्रदर्शनासाठी किती दिवसांचा अवधी द्यायचा यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी होणार आहे.राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचा विषय सर्वोच्च न्यायालयात चर्चेत राहिला. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं. राष्ट्रवादीच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याचा उल्लेख या पत्रात होता. ते पत्र आज न्यायालयात सादर करण्यात आलं.भाजपाच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या पत्राला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. त्या पत्रावर ५४ आमदारांच्या सह्या असतीलही, पण भाजपाला पाठिंब्याचा उल्लेखच नाही, असा युक्तिवाद राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आला. एका कारणासाठी घेतलेलं पत्र अजित पवारांनी दुसऱ्या कारणासाठी वापरलं, अशी बाजू काँग्रेस, राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवींनी मांडली.अजित पवार यांच्या वतीनं मणींदर सिंग यांनी बाजू मांडली. अजित पवारांनी ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र राज्यपालांना दिलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं हे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं, असा युक्तिवाद त्यांनी केला. मीच राष्ट्रवादी आहे. होय, मीच राष्ट्रवादी आहे, असंदेखील मणींदर सिंग अजित पवारांच्या वतीनं म्हणाले. त्यानंतर न्यायालयात एकच हशा पिकला.
Maharashtra Government: होय, मीच राष्ट्रवादी; अजित पवारांच्या वकिलाच्या युक्तिवादानं कोर्टात हशा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 1:07 PM