मुंबईः आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात आलो, सभागृहात आलो हे माझं भाग्यच आहे. सभागृहात येण्याचं दडपण होतं, मला सभागृहात कसं होईल याची चिंता होती, पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं. मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही. मी समोरासमोर लढणारा आहे. शत्रूला अंगावरती घेणारा आहे. आता कोणी शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभेच्या सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. देशात अनेक राज्य आहेत, त्यात आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. आता संपूर्ण देशही आपलाच आहे. हे दैवत ज्या मातीत जन्माला आलं, त्या मातीत जन्माला आलेल्या शिवरायांचे आम्ही भक्त आहोत. मी छत्रपती महाराजांची शपथ घेतली, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, हा जर गुन्हा असेल, तर तो एकदा नाही तर प्रत्येक जन्मात तो मी करेन, जो आईवडिलांना मानत नाही, तो पुत्र म्हणून जगायच्या लायकीचा नाही. विरोधकांशी सामना करणं हा आमचा अधिकार आहे. आम्हाला साधू, संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्र अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले आहेत. माझ्या मंत्रिमंडळावर या सभागृहानं जो विश्वास व्यक्त केलेला आहे, त्याबद्दल मी आपल्यामार्फत सर्वच सन्माननीय सदस्यांचे आभार व्यक्त करतो. मी तमाम मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा कारभार करता येणं शक्य नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महाविकास आघाडीची बहुमत चाचणी पार पडली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला. महाविकास आघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहिले आहेत. तर भाजपाने सभात्याग केला आहे.
दरम्यान, सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ.नितीन राऊत या सदस्यांना परिचय करून दिला.