मुंबई: राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असून राजकीय घडामोडी अतिशय वेगानं सुरू आहेत. महाविकासआघाडीच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 13 आमदार होते. त्यापैकी बहुतांश आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. कालपासून बेपत्ता झालेले राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केलेल्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला आहे. शहापूरचे आमदार दौलत दरोडांनी थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. 'मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, मी अतिशय सुरक्षित आहे. घड्याळ या निशाणीवर निवडून आल्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्न येत नाही. मी माननीय अजितदादा आणि माननीय शरद पवारसाहेब जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला मी बांधील आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माझी विनंती आहे,' असं दरोडा यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
Maharashtra Government: 'त्या' बेपत्ता आमदाराचा व्हिडीओ आला; पण भूमिकेमुळे गोंधळ आणखी वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 1:27 PM