ST Bus services suspended, Maharashtra to Karnataka: कर्नाटकात महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसचालकाच्या तोंडाला काळं फासलं आणि चालकाला मारहाणही केली. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड भाषा बोलता येते का? अशी विचारणा करत हा प्रकार घडवून आणला. या हल्ल्यानंतर, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार, कोल्हापुरातून कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बससेवा थांबविण्यात आल्याचा मोठा निर्णय झाला. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
शुक्रवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्गात कन्नड समर्थकांनी बसचालकावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बस चालकाच्या तोंडाला काळं फासले आणि त्याला मारहाण केली. या पाश्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेत महाराष्ट्रातील कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी थांबवण्याचे आदेश दिले. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच रोज रोजगारासाठी कोल्हापुरातून कर्नाटकात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला आहे, असे MSRTC चे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.
आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत!
काल रात्री उशिरा कर्नाटकातील चित्रदुर्गजवळ हा प्रकार घडला. या घटनेची माहिती चालकाने कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली. संबंधित प्रकारामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला. मंत्री प्रताप सरनाईक यांनीही यावर रोखठोक भूमिका मांडली. "या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. गावगुंडांनी प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली हे बरोबर नाही. तुमच्या बसही महाराष्ट्रात येतात असतात. वाद वाढायला नको. आम्ही आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री आहोत. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत," असा थेट इशाराच प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक सरकारला दिला.
कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर झालेल्या हल्ल्यामागे भाषेचा वाद जबाबदार मानला जात आहे. चित्रदुर्गात कन्नड समर्थकांनी केलेल्या हल्ल्यानंतर, महाराष्ट्राला लागून असलेल्या बेळगावमध्ये कर्नाटक बसच्या कंडक्टरला लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यात जखमी झालेल्या कंडक्टरला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती. मराठी न बोलल्यामुळे हा हल्ला झाल्याचे उघड झाले. चित्रदुर्ग जिल्ह्यात घडलेल्या घटनेची ही घटना प्रतिक्रिया होती असे मानले जात आहे.