कोल्हापूर : राज्यातील सरकार हे शेतकरी, दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी असंवेदनशील असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी गरजेची आहे; पण ही कर्जमाफी स्वप्नच राहणार असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी प्रा. कवाडे कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही शेतकऱ्याचा सात-बारा उतारा कोरा करावा, अशी मागणी लावून धरली आहे. सरकारकडे नागपूर ते मुंबई महामार्ग करण्यासाठी तसेच मुंबई ते गुजरातपर्यंत बुलेट ट्रेन चालविण्यासाठी पैसे आहेत; पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगितले जाते, हे दुर्दैव आहे.दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांबाबतही प्रा. कवाडे यांनी शासनाला टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, या प्रकरणी सरकारी यंत्रणेला आरोपी माहीत आहेत; पण ते विचारधारेशी संबंधित असल्याने त्या आरोपींना सरकार पकडत नाही, ही शोकांतिका आहे. देशभर बॉम्बस्फोट घडवीत असणाऱ्या ‘सनातन’ संस्थेवर ‘आरएसएस’च्या दबावामुळे शासन बंदी आणू शकत नाही. आरक्षणासाठी मराठासह ओबीसी समाजाचे सुमारे साडेपाच कोटी लोक मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरले; पण त्याचा शासनाने कोणताही विचार केला नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र सरकार असंवेदनशील
By admin | Published: April 24, 2017 3:24 AM