मुंबई: महाविकासआघाडीसाठी बैठकांचं सत्र सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपाला पाठिंबा दिला. त्यांना भाजपाकडून उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचं समजताच सुखद धक्का बसल्याचं भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधून अजित पवारांविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचं डिपॉजिट जप्त झालं. अजितदादांच्या शपथविधीची बातमी समजताच मला सुखद धक्का बसला. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे, असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष उत्तम काम केलं आहे. तर अजित पवार यांच्याकडे विधिमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मंत्रिपदांचा मोठा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. त्यामुळे फडणवीस आणि पवार यांचं एकत्र येणं राज्याच्या दृष्टीनं चांगलं असल्याचं पडळकर म्हणाले. काल सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला, त्यावेळी मी प्रवासात होतो. भाजपा नेते मिलिंद कोरेंचा मला फोन आला. त्यांनी मला शपथविधी संपन्न झाल्याची माहिती दिली. मात्र अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यानं मला धक्का बसला नाही. अजित पवार भाजपासोबत आल्यानं राज्यात स्थिर सरकार येणार आहे. अजित पवारांनी दूरदृष्टीनं हा निर्णय घेतला असेल, असंदेखील पडळकर यांनी म्हटलं. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देणं हा त्यांना भरभरुन मतदान करणाऱ्या जनमताचा सन्मान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यानं सध्या लोकांच्या भावना स्फोटक आहेत. मात्र हा स्फोटकपणा हळूहळू कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू. पक्षानं बारामतीत जाऊन काम करायचा आदेश दिल्यास तिथेही जाऊन काम करू, असंदेखील ते म्हणाले.
Maharashtra Government: अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदावर गोपीचंद पडळकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:44 PM