मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित वळण लागले असून आज सकाळीच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली. तर धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रतील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे.
एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
24 ऑक्टोबरला निकाल लागला. तेव्हापासून आतापर्यंत कोणीही सरकार बनवू शकले नाही. महाराष्ट्रासमोर मोठी संकटे आहेत. शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी व निर्णय वेगवान करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. गेले एक महिनाभर चर्चा काही संपतच नव्हती. मार्ग निघत नव्हता. नको त्या मागण्या पुढे येत होत्या. हे पाहता आताच अशा समस्या येत असतील तर हे तीन पक्षांचे सरकार पुढे कसे टिकणार. यामुळे मी निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी सांगितले.
शरद पवार अनभिज्ञ? शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहिती होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये; पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार म्हणाले.