- मोसीन शेख
मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा सुटला असून महाविकास आघाडीचं सरकार काही तासात स्थापन होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्ष पहिला तर यात, 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत तर 'मॅन ऑफ द सिरीज' राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठरले असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र त्यांनतर ह्या दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र यात सर्वात महत्वाची भूमिका संजय राऊत यांची होती. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याची मागणीवरून त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेचा विषय बनला होता.
भाजपकडून मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याचे लक्षात येताच शिवसेना दुसऱ्या पर्यायाच्या तयारीत होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी हालचालींना वेग येताने पाहायला मिळत होते. यासाठी संजय राऊत यांनी पुढाकार घेत शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र त्यासाठी काँग्रेसच्या हायकमांड यांचे ग्रीन सिग्नल मिळणे सुद्धा तेवढेच महत्वाचे होते.
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींची मनधरणी करणे अशक्य असल्याने ही जवाबदारी पवारांवर आली. त्यामुळे पवारांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांनतर सोनिया गांधी यांनी सुद्धा सरकार स्थापनेला परवानगी दिली. आणि अखेर महाविकास आघाडीचा सत्तेस्थापनेचा मार्गे मोकळा झाल्याचा पाहायला मिळाले.
मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील सर्व घडामोडी लक्षात घेतल्या तर, यात संजय राऊत आणि शरद पवारांची भूमिका महत्वाची असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याची चर्चा झाली. त्यांनतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला. मात्र या सर्व परस्थितीत सुद्धा या दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका कायम ठेवत सत्तेचा तिढा सोडवून दाखवले. त्यामुळे राज्यात स्थापन होत असलेल्या सत्तास्थापनेत 'मॅन ऑफ द मॅच' राऊत तर 'मॅन ऑफ द सिरीज' शरद पवार ठरले असल्याचे बोलले जात आहे.