मुंबई - जून महिन्यात घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले होते. तर एकनाथ शिंदेभाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले होते. मात्र ३० जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या शपथविधीनंतर पंधरवडा उलटत आला तरी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली असून, येत्या १९ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड केलेल्या आमदांरांच्या गटातील ज्येष्ठ नेते आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार अशी विचारणा आमदार संजय शिरसाट यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, उद्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मुंबईत येत आहेत. त्यांच्यासोबत बैठक होणार आहे. १५ तारखेला आमची एक बैठक आहे. १६ आणि १७ तारखेलाही काही कार्यक्रम आहे. तर १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहेत. त्यामुळे १९ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याशिवाय हे सरकार चालू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या सरकारमध्ये ४२ च्या आसपास मंत्री राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपाचे २५ ते २७ आणि शिंदे गटाचे १५ ते १७ मंत्री असू शकतात. मात्र या सरकारची वाटचाल ही कोर्टात सुरू असलेल्या विविध याचिकांवर होणाऱ्या सुनावणीवरही या सरकारचं भवितव्य अवलंबून असेल.