मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहणारे १३ पैकी १२ आमदार स्वगृही परतले आहेत. यापैकी दौलत दरोडा आणि अनिल पाटील यांनी त्यांची आपबिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली. आम्ही दोन दिवसांपासून गायब होतो, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला फुटीर आमदार म्हटलं जातं आहे. मात्र आम्ही शरद पवारांसोबत आहोत आणि यापुढेही कायम राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. दौलत दरोडा आणि अनिल पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शनिवारपासून त्यांच्यासोबत नेमकं काय काय घडलं, याची माहिती दिली. 'शनिवारी अजित पवार यांनी आम्हाला बोलावलं होतं. ते आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यांनी आम्हाला आदेश दिला की सकाळी ७ वाजता भेटायचं आहे. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे गेलो. त्याठिकाणी शपथविधी आटोपला. राष्ट्रवादी आणि भाजपाचं सरकार स्थापन होऊ शकतं, असा संदेश आम्हाला आला होता. बाकीचे आमदार नंतर येतील. आता आपण सगळ्यांनी निघायचं आहे, असा निरोप आम्हाला मिळाला होता. त्यामुळे आम्ही राजभवनात शपथविधीसाठी गेलो', असं अनिल पाटील यांनी सांगितलं.
Maharashtra Government: राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा, अनिल पाटीलही परतले; आपल्यासोबत काय-काय घडले ते सांगितले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 2:42 PM