मुंबई : शिवसेनेने आतापर्यंत कायम हिंदुत्वाची भूमिका घेतली असली तरी त्या पक्षासमवेत सरकार स्थापन करावे, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुस्लीम नेत्यांनीच पुढाकार घेतला, हेही आता स्पष्ट झाले आहे.भाजप व शिवसेना यांचे सरकार राज्यात स्थापन होऊ शकत नाही, हे लक्षात येताच शिवसेनेला आपण सरकार बनवण्यासाठी पाठिंबा द्यावा, अशी भूमिका सर्वात आधी घेतली, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी. शिवसेनेने यापूर्वी साबीर शेख यांना मंत्री केले होते आणि शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका आपणास मान्य नसली तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आता खूप बदल झाला आहे, असे त्यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना ठामपणे सांगितले. तसेच आपण शिवसेनेसोबत जाणे का गरजेचे आहे, हे वारंवार स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही शिवसेनेशी आपण आघाडी करून सरकार स्थापन करावे, असेच कायम स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते व माजी आमदार नसीम खान यांनीही शिवसेनेसोबत आपण सरकार स्थापन करायला हवे, असे दिल्लीतील नेत्यांना समजावून सांगितले. काँग्रेसचे खा. हुसेन दलवाई आणि नसीम खान या दोन्ही मुस्लीम नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचा विरोध मावळण्यास बरीच मदत झाली. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले मराठवाड्यातील अब्दुल सत्तार यांनीही तीन पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे पक्षाच्या नेत्यांना सांगितले. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीसह आघाडी सरकार स्थापन करण्यास आक्षेप होता. पण सत्तार यांच्यासह इतर नेत्यांनी अशा आघाडीने शिवसेनेचा तोटा होणार नाही, हे पटवून सांगितले.शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र!समाजवादी पक्ष कायमच शिवसेनेविरोधी भूमिका घेत आला आहे. पण समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबु आसिम आझमी यांनीही महाराष्ट्रात शिवसेनेसह आघाडीचे सरकार बनवायला हवे, असेच मत व्यक्त केले. भाजप हा आपला मुख्य शत्रू आहे आणि शिवसेना आता भाजपचा शत्रू बनला आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या भूमिकेतून शिवसेनेसोबत जायला हवे आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असे जाहीर मतही आ. आझमी यांनी व्यक्त केले.
Maharashtra Government: शिवसेनेशी आघाडीसाठी मुस्लीम नेत्यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 2:15 AM