मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणाऱ्या आणि त्यांना राज्याला स्थिर सरकार देण्याचं आश्वासन देणाऱ्या अजित पवारांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी मोदींना धन्यवाद देणारं ट्विट केल्यानंतर शरद पवारच आपले नेते असल्याचं दुसरं ट्विट केलं. त्यावरुन शरद पवारांनी अजित पवारांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपासोबत न जाता शिवसेना आणि काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला आहे. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करेल. अजित पवारांचं विधान खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे. मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईल. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असं ट्विट अजित पवारांनी काही वेळापूर्वीच केलं आहे. काल सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिवसभर अजित पवार सोशल मीडियावर सक्रीय नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातीय भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी अजित पवारांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र काल अजित पवारांनी यापैकी कोणाच्याही ट्विटला उत्तर दिलं होतं. मात्र आज संध्याकाळी त्यांनी मोदी, शहांसह भाजपाच्या अनेक मंत्र्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे आभारदेखील मानले.