पुणे : आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत. ठाकरे यांच्या बरोबर कोण कोण शपथ घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळदेखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबद्दलची माहिती भुजबळ यांनी पुण्यात दिली.महात्मा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्त भुजबळ पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, शरद पवार यांनी आजच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादीकडून ज्या दोन नावांची निवड केली, त्यात माझे देखील नाव आहे. त्यामुळे संध्याकाळी मीदेखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. कुठले मंत्रिपद असेल याबाबत अजून काहीही ठरलेले नाही. याबाबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आजचा शपथविधी करणे आणि विश्वासदर्शक ठराव मंजूर करणे हे आमच्या समोरील मोठे काम आहे.अजित पवार पक्षात परत यावेत यासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले. ते परत आले म्हणून मी त्यांचा आभारी आहे. पवार साहेब त्यांच्या खांद्यावर जी जबाबदारी टाकतील, ती ते नक्कीच पार पाडतील. शिवसेनेबाबत बोलताना ते म्हणाले, शिवसेनेमध्ये माझी राजकीय व सामाजिक सुरुवात झाली. काही कारणांमुळे मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलो. शरद पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा मी त्यांच्यासोबत बाहेर पडलो आणि राष्ट्रवादीमध्ये गेलो. आज तीनही पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करत आहेत याचा आनंद आहे.
Maharashtra Government: राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 2:20 PM