Maharashtra Government: 'देवेंद्र सरकार-2' संकटात?; अजित पवारांचा 'व्हीप' अधिकृत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 09:06 AM2019-11-26T09:06:10+5:302019-11-26T09:07:05+5:30
अजित पवारांना मोठा धक्का; बहुमत चाचणीत भाजपाची कसोटी लागणार
- अतुल कुलकर्णी
मुंबई : राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे.
विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचे पत्र सोमवारीे दिले आहे. त्यानुसार जयंत पाटीलच गटनेते असतील. त्यामुळे ते वा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असतो.
भागवत म्हणाले, विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष वा सरचिटणीस करतो. निवडीची माहिती ३० दिवसांत विधानसभा अध्यक्ष वा विधान भवनाच्या सचिवांकडे द्यावी लागते. शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे.
राज्यपाल व विधिमंडळ या दोन स्वतंत्र घटनात्मक संस्था आहेत. दोन्ही ठिकाणी गटनेता निवडल्याची माहिती द्यावी लागते. राष्ट्रवादीने राज्यपालांकडे कोणती माहिती दिली हे विधानसभाध्यक्षांना ठाऊक नसते. राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केल्याची माहिती अध्यक्षांना कळवली नव्हती. त्यामुळे त्यांना विधिमंडळ गटनेता समजता येणार नाही. आता जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती दिल्यामुळे तेच पक्षाचे विधिमंडळ गटनेते असतील.
तो अधिकार पक्षाचाच
राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची नोंद पक्षाने विधान मंडळाकडे केलेली नाही. काँग्रेसने अद्याप गटनेता निवडलेला नाही. ही निवड कधी करायची हा पक्षाचा अधिकार असतो.