मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. भाजपा विरुद्ध महाविकासआघाडी यांच्यात गेल्या महिन्याभरापासून सरकार स्थापनेवरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाविकासआघाडी राज्यात सत्ता स्थापन करेल. सत्ता संघर्ष संपुष्टात आल्यानं नवनिर्वाचित आमदारांचा महिन्याभरापासून रखडलेला शपथविधी विधान भवनात संपन्न झाला. यंदाच्या निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे आता विधानसभेत अनेक तरुण आमदार दिसतील. या नवनिर्वाचित आमदारांनी आज शपथ घेतली. त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या शपथविधीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, असं म्हणत रोहित यांनी शपथ घेतली. रोहित यांनी शपथ घेताना त्यांच्या आईचं नाव आवर्जून घेतलं. त्यामुळे त्यांची शपथ विशेष ठरली. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. कर्जत जामखेडची निवडणूक राज्यभरात गाजली होती. त्यात राम शिंदेंना पराभूत करत रोहित पवार जायंट किलर ठरले. रोहित यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. रोहित यांच्यासोबतच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, स्वाभिमानीचे देवेंद्र भोयार, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर, शिवसेनेचे योगेश कदम, राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनीदेखील आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे अनेक नवे आणि तरुण चेहरे यंदाच्या विधानसभेत पाहायला मिळतील.