मुंबई: नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागतासाठी विधान भवन परिसरात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अचानक तिथून बाहेर पडल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपासून सुप्रिया सुळे विधिमंडळात उपस्थित होत्या. त्यांनी अजित पवार, रोहित पवार, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, प्रणिती शिंदेंचं विधान भवनात स्वागत केलं. मात्र अचानक त्यांना फोन आला आणि त्या तिथून धावत धावत बाहेर पडल्या. त्यामुळे सुप्रिया सुळेंना नेमका कोणाचा फोन आला, याची चर्चा विधान भवन परिसरात सुरू झाली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपाचं सरकार कोसळलं. त्यामुळे महाविकासआघाडीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आज सकाळी विधान भवन परिसरात सुप्रिया सुळे नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागताला उपस्थित होत्या. अजित पवार विधान भवनात दाखल होताच सुप्रिया यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादीतून बंडखोरी करत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी काल सिल्व्हर ओकवरुन जाऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळीही तिथे सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरे, रोहित पवार या तरुण आमदारांचं विधान भवन परिसरात उत्साहात स्वागत केलं. यानंतर तटकरे कुटुंब विधान भवनात दाखल झालं. तटकरे कुटुंबासोबत फोटो सेशन करताना सुप्रिया सुळेंना एक फोन आला आणि त्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दूर सारत तिथून निघाल्या. सुप्रिया सुळे अतिशय घाईघाईंनं आणि धावत पळत विधान भवन परिसरातून निघाल्यानं त्यांना नेमका कोणाचा फोन आला, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.
'तो' फोन आला अन् सुप्रिया सुळे विधान भवनातून धावत निघाल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 10:49 AM