Maharashtra Government: हे भविष्य संविधानाच्या हाती... 'सर्वोच्च' निकाल येताच अजित पवारांचं सूचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:39 PM2019-11-26T13:39:31+5:302019-11-26T13:41:35+5:30
Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांचं ट्विट
मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला धक्का दिला आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदान शक्य तितकं पुढे ढकलण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान दिनानिमित्त ट्विट केलं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांचं ट्विट अतिशय सूचक मानलं जात आहे.
लोकशाहीवर आधारित आजचा भारत घडवण्याचं काम आपल्या संविधानानं केलं आहे. आपलं भविष्य घडवण्यासाठीदेखील ते सहाय्यभूत ठरेल, असं ट्विट अजित पवारांनी केलं. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत घेण्याचे आदेश दिल्यानंतर १० मिनिटांत त्यांनी हे ट्विट केलं. राज्याच्या सत्ता संघर्षाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
Our Constitution has helped us shape the democratic India of today & will help us define our tomorrow!#ConstitutionofIndia#ConstitutionDaypic.twitter.com/R1UB0cPJJl
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 26, 2019
सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी जवळपास २७ तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.
एका बाजूला भाजपाकडून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या घरवापसीसाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच पवार कुटुंबाकडूनही अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांना भावनिक साद घालत त्यांना स्वगृही परतण्याचं आवाहन केलं. मात्र अजित पवार भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी वर्षावर निघून गेले. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता धूसर झाली आहे.