मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला धक्का दिला आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदान शक्य तितकं पुढे ढकलण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान दिनानिमित्त ट्विट केलं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांचं ट्विट अतिशय सूचक मानलं जात आहे. लोकशाहीवर आधारित आजचा भारत घडवण्याचं काम आपल्या संविधानानं केलं आहे. आपलं भविष्य घडवण्यासाठीदेखील ते सहाय्यभूत ठरेल, असं ट्विट अजित पवारांनी केलं. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत घेण्याचे आदेश दिल्यानंतर १० मिनिटांत त्यांनी हे ट्विट केलं. राज्याच्या सत्ता संघर्षाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
Maharashtra Government: हे भविष्य संविधानाच्या हाती... 'सर्वोच्च' निकाल येताच अजित पवारांचं सूचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:39 PM