Maharashtra Government : 'संविधान दिनी जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 02:31 PM2019-11-26T14:31:42+5:302019-11-26T14:43:37+5:30
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तर या निकालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. निर्णयानंतर संविधान दिनी जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट असं देखील त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (26 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. संवैधानिक व लोकशाही मूल्यांनी राजकारणावर मिळविलेला हा विजय आहे. हा निर्णय अद्भुत आहे. छोटा पण गोड. 24 तास,थेट प्रक्षेपण, खुला असा सभागृहात फैसला होईल. सत्यमेव जयते. जय हिंद,जय महाराष्ट्र' असं ट्विट केलं आहे.
संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. संवैधानिक व लोकशाही मूल्यांनी राजकारणावर मिळविलेला हा विजय आहे.हा निर्णय अद्भुत आहे. छोटा पण गोड.२४ तास,थेट प्रक्षेपण, खुला असा सभागृहात फैसला होईल.
— Supriya Sule (@supriya_sule) November 26, 2019
सत्यमेव जयते.जय हिंद,जय महाराष्ट्र#आम्ही१६२
आज यावर निकाल देताना न्यायालयाने उद्याच (बुधवारी) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. उद्या संध्याकाळी 5 वाजता विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या. बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करुन विश्वासदर्शक ठराव मांडून खुलं मतदान घ्या, असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे.
मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही! https://t.co/gVgu7z5RKc#MaharashtraGovtFormation#SupremeCourt
— Lokmat (@MiLOKMAT) November 26, 2019
भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून आपली नाराजी व्यक्त केली होती. 'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत' असं भावनिक ट्विट सुप्रिया यांनी केलं होतं. तसेच पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 'पार्टी अँड फॅमिली स्प्लिट' असं नवं स्टेटस त्यांनी ठेवलं. आमच्या पक्षातच नव्हे तर कुटुंबातही फूट पडली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.