Maharashtra Government: शिवसेनेच्या याचिकेला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी
By अतुल कुलकर्णी | Published: November 13, 2019 05:29 AM2019-11-13T05:29:55+5:302019-11-13T05:30:38+5:30
सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अतुल कुलकर्णी
मुंबई : सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या या याचिकेला बळ मिळावे म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे दोन दिवसाची मुदतवाढ मागितली, अशी माहिती समोर आली आहे.
राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र तशी तयारी दर्शविलेल्या पक्षांना त्यांनी वेळ वाढवून दिला नाही, असा युक्तीवाद न्यायालयात करता यावा यासाठी राष्ट्रवादीने मंगळवारी रात्री साडेआठची मुदत संपण्याच्या आतच राज्यपालांना पत्र देऊन दोन दिवस वाढवून मागितले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची मागणीही राज्यपालांनी फेटाळली व राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली.
भाजपला महाराष्ट्रात भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाचे सरकार नको आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई केली, असा शिवसेनेचा दावा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील राज्यपालांनी शेवटचा पर्याय म्हणून काँग्रेसला ही विचारणा करायला हवी होती. काँग्रेसलाही वेळ द्यायला पाहिजे होता, पण तो दिला नाही अशी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळी राजकीय सूत्रे वाय बी चव्हाण सेंटर येथे बसून हलवत आहेत. अहमद पटेल यांच्याशीही ते सतत संपर्कात आहेत. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जावे हा सल्ला त्यांनीच दिला. शिवसेना नेते अनिल परब हे स्वत: कपिल सिब्बल यांच्याशी बोलले. सिब्बल यांच्याशी पवार यांनीही बोलणे केल्याची सूत्रांनी माहिती दिली.
राष्टÑवादीने राज्यपालांकडे मुदतवाढ मागितल्याची कोणतीही माहिती काँग्रेसला नव्हती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांकडूनही वेगवेगळी विधाने समोर आली. परिणामी दोन्ही पक्षातल्या समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.