Ajit Pawar Resign: उपमुख्यमंत्रिपद सोडणारे अजित पवार राजकारणातूनही संन्यास घेणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:06 PM2019-11-26T15:06:31+5:302019-11-26T15:07:09+5:30

शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Maharashtra Government News: Ajit Pawar Resigns as Deputy Chief Minister and taking retirement from politics? | Ajit Pawar Resign: उपमुख्यमंत्रिपद सोडणारे अजित पवार राजकारणातूनही संन्यास घेणार? 

Ajit Pawar Resign: उपमुख्यमंत्रिपद सोडणारे अजित पवार राजकारणातूनही संन्यास घेणार? 

googlenewsNext
ठळक मुद्देउद्या बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिले.त्यानंतर काही तासांतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी अजित पवार यांना भावनिक साद घातली होती.

मुंबईः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच राज्यात नवं राजकीय नाट्य घडताना पाहायला मिळतंय. उद्या बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर, सगळ्यांनीच आकडेमोड सुरू केली होती. 'आम्ही १६२' या आकड्यावर महाविकासआघाडीचे नेते ठाम होते, तर इकडे भाजपाची मंडळी १७० ची हमी देत होती. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राजकारणाने वेगळं वळण घेतलंय. अजितदादांनी केवळ उपमुख्यमंत्रिपदच सोडलं नसून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णयही त्यांनी पक्का केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. 

विधानसभा निवडणुकीआधी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवार यांनी गेल्या शनिवारी राज्यात मोठाच राजकीय भूकंप घडवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी, आपले काका शरद पवार यांच्याशी बंड पुकारत त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. अत्यंत घाईघाईत हा शपथविधी उरकण्यात आला होता. त्यानंतर पुढचे दोन दिवस राजकारणात अक्षरशः भागम् भाग सुरू होती. एकीकडे, अजित पवार यांचं मन वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते, पवार कुटुंब फुटू नये यादृष्टीने हालचाली सुरू होत्या, तर दुसरीकडे राज्यातील शपथविधीविरोधात, भाजपाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज कोर्टाने निकाल सुनावला होता आणि उद्याच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विश्वास सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, या सुनावणीनंतर काही तासांतच, अजित पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सगळंच चित्र बदललं.   

पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी अजित पवार यांना भावनिक साद घातली होती. विविध नेते त्यांना भेटत होते. परंतु, त्यांना हात हलवतच परतावं लागत होतं. मात्र, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सदानंद सुळे यांनी सूत्रं हाती घेतली आणि ते अजितदादांचं मन वळवण्यात यशस्वी झाले. त्यानंतरच, अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मात्र त्याचवेळी, यापुढे राजकारणात न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतल्याचं समजतं.

अजित पवार हे राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्रं घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. परंतु, त्यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी सूत्रं हाती घेतली आणि सर्व आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यातही यशस्वी झाले. त्यामुळे अजित पवारांचा अपेक्षाभंग झाला. जवळपास ३० आमदार येतील असं अजित पवारांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. दुसरीकडे, पवार कुटुंबाकडून दबाव वाढला होता. अखेर, त्यापुढे पवार झुकले आणि त्यांचं बंड थंड झालं. या सगळ्या प्रकारामुळे अजितदादांच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. पवार कुटुंब त्यांना स्वीकारेल, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आधीइतका आदर असेल का, हा प्रश्नच आहे. तो ओळखूनच अजित पवार राजकारण सोडतील, असं बोललं जातं. तब्बल ३६ वर्षं अजित पवार राजकारणात आहेत. जे मनात आहे, ते बोलणारे - करणारे आणि परिणामांचा फारसा विचार न करताच निर्णय घेणारे नेते ही त्यांची ओळख. पण ही खासियतच त्यांच्या अंगलट आली असं म्हणावं लागेल.

Web Title: Maharashtra Government News: Ajit Pawar Resigns as Deputy Chief Minister and taking retirement from politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.