Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 02:41 PM2019-11-26T14:41:26+5:302019-11-26T14:59:08+5:30
Maharashtra CM Devendra Fadnavis : बहुमताची जुळवाजुळव होत नसल्यानं राजीनामा देण्याची शक्यता
मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून राजीनाम्याची घोषणा केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयानं भाजपाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याआधीच फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
विश्वासदर्शक ठरावावरील मतदान जास्तीत जास्त दिवस टाळण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्या ५ वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. बहुमत चाचणीवेळी खुलं मतदान घ्या आणि या चाचणीचं थेट प्रक्षेपण करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे आता बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपाकडे जवळपास २६ तासांचा अवधी आहे. मात्र इतक्या कमी वेळात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करणं अतिशय कठीण आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊ शकतात.
शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचवेळी अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील अनेक आमदार बाहेर पडतील, असा भाजपामधील अनेकांचा अंदाज होता. मात्र अजित पवारांच्या शपथविधीवेळी उपस्थित असणारे जवळपास सर्वच आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतले. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं भाजपासाठी अवघड झालं. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं भाजपाला धक्का बसला आहे.