Maharashtra Government: सिंचन घोटाळ्याचे गाडीभर कागद आम्ही केव्हाच रद्दीत विकले; खडसेंनी डिवचले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:04 PM2019-11-27T12:04:45+5:302019-11-27T12:17:14+5:30
भाजपाचे फायरब्रँड नेते असलेल्या एकनाथ खडसेंनीही या मुद्द्यावर भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
मुंबईः काल घडलेल्या राजकीय नाट्यानंतर भाजपाचं सरकार कोसळलं. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फडणवीसांनी अजित पवारांबरोबर युती केल्याचं भाजपाच्या अनेक नेत्यांना रुचलेलं नव्हतं. भाजपाचे फायरब्रँड नेते असलेल्या एकनाथ खडसेंनीही या मुद्द्यावर भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
पत्रकारांनी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या बैलगाडीभर पुराव्यासंबंधी खडसेंना विचारले असता ते म्हणाले, बैलगाडीभर आम्ही जे काही पुरावे गोळा केले होते, ते आम्ही केव्हाच रद्दीमध्ये विकले आहेत. त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता. खडसेंच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खडसे पुढे म्हणाले, 2014ला भारतीय जनता पार्टीकडून दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये सामूहिक निर्णय झाला. भारतीय जनता पक्षानं एकट्याच्या बळावर निवडणुका लढवल्या पाहिजेत. जो निर्णय झाला, तो विरोधी पक्षनेता असल्यानं मी तेव्हा घोषित केला. हा निर्णय माझा स्वतःचा नव्हता, तर तो पक्षाचा निर्णय होता. त्या निर्णयाच्या अनुषंगानं जे काही चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं ते सर्वांनीच पाहिलं. त्यानंतर ही चूक दुरुस्त करण्याचाही प्रयत्न झाला.
सहा महिन्यांनंतर परत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आली. युतीच्या माध्यमातून आम्ही साडेचार वर्षं सरकार चालवलं. महायुती पाहूनच जनतेनं आम्हाला मतदान केलं आणि स्पष्ट असे 161 जागांचं बहुमत दिलं. दुर्दैवानं या ठिकाणी मुख्यमंत्रिपद कोणाला, किती वर्ष पाहिजे या एका मुद्द्यावरून एकमत होऊ न शकल्यानं भाजपा आणि शिवसेना वेगवेगळी झाली. गेल्या महिन्याभरात जे काही झालं ते आपण पाहिलंच आहे. भाजपा तावडे, मेहता, बावनकुळेंसारख्या नेत्यांना सोबत घेऊन लढली असती तर आणखी 25 एक जागा भाजपाला जिंकता आल्या असत्या. मला डावलल्याची भावना आजही कायम असल्याचंही खडसे म्हणाले आहेत. मला जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचं कारण काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मी पक्षासाठी 42 वर्षे तपश्चर्या केली. पक्ष वाढावा यासाठी मेहनत घेतली. पण पक्षाच्या विस्तारासाठी खस्ता खाणाऱ्या नेत्यांनाच बाजूला करण्यात आलं, अशा शब्दांत खडसेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली.