मुंबईः महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, लवकरच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचं सरकार येणार असून, भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंचं सुपुत्र आणि भाजपाचे आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मला अभिमान आहे की ज्या पक्षाकडून मी आमदारकीची शपथ घेतलेली आहे, त्या पक्षानं सत्तेसाठी लाचारी केली नाही. जेव्हा आमच्याकडे समर्थन नव्हतं, तेव्हा आमचे नेते फडणवीसांनी सांगितलं की, सत्ता स्थापन करू शकत नाही. त्याच्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मीटिंग घेतली नाही. लोकांचे तळवे चाटले नाहीत म्हणून मला अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.विधिमंडळ आणि मुख्यमंत्रीची खुर्ची थोडी वेगळी आहे. बंगल्यात बसून आदेश देणं सोपं असतं. विधिमंडळात प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि ती अधिकृत द्यावी लागतात. सभागृहात काय होणार आहे लवकरच कळेल. घोडामैदान तयार आहे आणि प्रत्येक प्रश्न हा महाराष्ट्राच्या हक्कासाठी विचारू. आम्ही महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. महाराष्ट्राच्या जनतेला आमच्याकडून फार अपेक्षा आहेत. समोर सत्तेत बसलेली लोकं जनतेला न्याय मिळवून कसा देणार आहेत, त्याची उत्तर त्यांना आम्हाला द्यावी लागणार आहेत. पहिला सातबारा कोरा करावा लागेल. शिवस्मारक बनवावं लागेल.पहिल्या दिवसापासूनच आमचा गोळा बारूद तयार आहे. आता फक्त मैदानात या, असं आव्हानच त्यांनी शिवसेनेला दिलं आहे. अजित पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीत परतण्यावर ते म्हणाले, कुठलंही कुटुंब तुटता कामा नये. पवार कुटुंब त्या निमित्तानं एकत्र झालेलं आहे, मला त्याचं समाधान आहे. त्याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आहे. पण एक कुटुंब एकसंध राहत असेल, तर त्यासारखं दुसरं समाधान नाही. पहिलं अधिवेशन कधी लागतंय याची मी वाट पाहतो आहे, असंही ते म्हणाले आहेत.
Maharashtra Government: बंगल्यावर बसून आदेश देणं वेगळं, आता उत्तरं द्यायची आहेत; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:52 PM